रत्नागिरी : 'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७'ची सराव चाचणी पार
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । ''कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७''ची सराव चाचणी आणि सन्मान सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून
कोकण हाफ मॅरेथॉनची प्रॅक्टिस रन


रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । 'कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन २०२७'ची सराव चाचणी आणि सन्मान सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला.

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर कॉम्रेड स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी, सायकलने 'एव्हरेस्टिंग' यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अथर्व शेंडे, 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' पूर्ण केल्याबद्दल उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचा यात समावेश होता.

मॅरेथॉनमध्ये भाग घेणे ही केवळ एक स्पर्धा नसून, ती एक निरोगी जीवनशैली आहे. आजच्या वाढत्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे. कोकणातील क्रीडा संस्कृती आणि पर्यटनाला उभारी देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे मत यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. स्थानिक खेळाडूंना आणि क्रीडा उपक्रमांना शासनातर्फे नेहमीच सर्वतोपरी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी आगामी मुख्य मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व धावपटू व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बंड्या साळवी, प्रांताधिकारी जीवन देसाई, रत्नागिरी सायकलिंग क्लबचे महेश सावंत यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande