
लातूर, 28 जून (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत जिल्हाभर एकाचवेळी 'मास रेड' मोहीम राबवली. या विशेष कारवाईत अवैध दारू विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९० आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे ३ लाख ९९ हजार २५० रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात विशेष नियोजन करून ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री, हातभट्टी दारूची निर्मिती, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
पोलीस प्रशासनाने केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, वारंवार अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या सराईत आरोपींची स्वतंत्र माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. अशा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अवैधरित्या हातभट्टी दारूचे गाळप करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए कायद्यातील कलम ३(१) अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध दारू विक्री, साठवणूक, वाहतूक तसेच इतर कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधितांविरुद्ध सातत्याने प्रभावी कारवाई करून कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, लातूर पोलीस दलाने पुढील काळातही अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा इतर कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांनी नमूद केले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis