पोलिओमुक्त भारताच्या ध्येयपूर्तीसाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचवूया - जिल्हाधिकारी प्रसाद
जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ नाशिक, 28 जून (हिं.स.)। पोलिओमुक्त भारताचे ध्येय साकार करण्यासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण पोहोचणे अत्यावश्यक असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू
Let's reach every child


जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ

नाशिक, 28 जून (हिं.स.)।

पोलिओमुक्त भारताचे ध्येय साकार करण्यासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण पोहोचणे अत्यावश्यक असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी सर्व पालक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आरोग्य उपसंचालक डॉ. गोविंद चौधरी, अतिरिक्त उपसंचालक डॉ. योगेश चित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. प्रकाश नंदापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. बाळू पाटील, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी तसेच आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दोन थेंब जिंदगीचे... पोलिओला हरवूया, देशाला जिंकवूया! या घोषवाक्याला साद देत यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 'दोन थेंब' पाजून जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, पोलिओ हा गंभीर आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास तो पूर्णपणे टाळता येतो. नियमित लसीकरणातील सर्व डोस घेतले असले तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील डोस प्रत्येक बालकाला देणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका व सर्व यंत्रणा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त नाशिक व पोलिओमुक्त भारताच्या ध्येयपूर्तीत योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश पाटील यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande