
लातूर, 28 जून (हिं.स.)।
उदगीर तालुक्यातील हेर येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पशुधन लसीकरण जनजागृती व प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात गावातील पशुपालकांना गायी, म्हशी तसेच इतर पशुधनाच्या आरोग्यासाठी नियमित लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पशुधनामध्ये होणारे ब्लॅक क्वार्टर (लंगडा रोग), लंपी त्वचा रोग तसेच इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. ज्ञानेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुपालकांना जनावरांची काळजी, रोग प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरणाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नियमित लसीकरणामुळे पशुधनाचे आरोग्य सुधारते तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान हेर गावातील पशुधनासाठी विविध रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगद सूर्यवंशी, विभाग प्रमुख डॉ. शिवशंकर वानोळे, पी. बी. डॉ. सुशांत गादगे तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी भिंगोले अभिजित, काळे संतोष, देवकर दर्शन, पाटील अजय, बिरादार चांदुरे शुभम, चव्हाण रंजित, गोविंद अडाव, दळवी आदित्य, प्रणव आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी शिक्षणातील प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis