

रायगड, 28 जून (हिं.स.)। : हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी आणि भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक बी. जी. शिकारे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी स्वागतपद सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हाशिवरे हितवर्धक मंडळाचे खजिनदार अॅड. शैलेश मोकल यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शुभांगी म्हात्रे यांनी केले.
यावेळी शैक्षणिक मार्गदर्शक मिलिंद धोदरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाच्या संधी आणि कौशल्य विकास याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी-बारावीचे तसेच वैजाळी इंग्रजी माध्यम शाळेतील दहावीचे मिळून सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद धोदरे, निलेश पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, जयवंत पाटील, शशिकांत मिठाग्री, प्रभाकर ठाकूर, उदय म्हात्रे आणि कु. श्रेयस ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बब्रुवाहन दिगंबर गायकवाड यांनी आगरी समाज संस्थेस ₹५,००० ची देणगी जाहीर केली. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व साहित्यिक दिलीप रामदास मोकल यांनी ₹१,००० ची देणगी देऊन सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.
कार्यक्रमास हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती सरोज डाकी, खजिनदार अॅड. शैलेश मोकल, सल्लागार सुबोध मोकल, सदस्य निशिकांत मोकल, मुख्याध्यापक ब. दि. गायकवाड, वैजाळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा म्हात्रे, सौ. प्रज्ञा धसाडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमानंतर आतापर्यंत एकूण ३०० विद्यार्थ्यांना करिअर व शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या या अभियानाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)