
लातूर, 28 जून (हिं.स.)।
भारतीय किसान संघ (जिल्हा लातूर) आणि स्वागत समिती अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, अहमदपूर शहरालगत असलेल्या रुद्धा पाटी येथील श्री साई गणेश मिल्ट्री कॅम्पवर एका भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार प्राप्त शेतकरी नेते डॉ. श्रीरंग लाड दादा यांचा अहमदपूर व चाकूर तालुक्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती पद्मश्री डॉ. श्रीरंग लाड यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी 'विषमुक्त शेती' विकसित करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा खोरे महामंडळाचे सेवानिवृत्त संचालक राम घोटे होते. तर स्वागत अध्यक्ष म्हणून माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मधुमक्षिका पालन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिनकर पाटील उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी यलाले, विशेष अतिथी तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद भुतडा, हणमंत शेळके आणि भारतीय किसान संघाच्या जिल्हा महिला प्रमुख श्रीमती शामलताई हुर्दळे उपस्थित होत्या.
या मेळाव्यात अहमदपूर व चाकूर तालुक्यातील ३१ नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले. सूत्रसंचालन भारतीय किसान संघाचे जिल्हा कार्यालय मंत्री विलास आराध्ये व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अमोल नराळे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis