
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । नद्यांमधील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचीस पर्यावरणशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. पांडुरंग यशवंत पाटील यांनी विकसित केलेल्या मायक्रोप्लास्टिक वर्गीकरण उपकरणाला भारत सरकारकडून पेटंट मंजूर करण्यात आले आहे.
या यशामुळे नदी संवर्धनाच्या क्षेत्रात रत्नागिरी उपकेंद्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
नद्यांच्या प्रवाहात साचणारे ५ मिलिमीटरपेक्षा लहान मायक्रोप्लास्टिकचे कण अत्यंत घातक ठरत असतात. त्यावरचा उपाय म्हणून डॉ. पाटील यांनी तयार केलेले नावीन्यपूर्ण उपकरण नद्यांच्या प्रवाहात सूक्ष्म प्लास्टिक कण अचूकपणे अडवून त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण करण्यास सक्षम आहे. नदीतील पालापाचोळा आणि काड्या अशा नैसर्गिक जैविक कचऱ्यापासून प्लास्टिकचे कण वेगळे करण्यासाठी यामध्ये ‘मल्टी-स्टेज फिल्टरेशन’ ही विशेष संकल्पना वापरण्यात आली आहे.
भविष्यात हे उपकरण अधिक प्रगत करतानाच सौर ऊर्जेवर चालणारे, स्वयंचलित फिल्टर क्लीनिंग आणि रिअल-टाइम डेटा देणारे स्मार्ट सेन्सर्स बसवण्याचे नियोजित आहे.
कोकण किनारपट्टीवरील संवेदनशील नदी परिसंस्थांच्या संरक्षणासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे.
शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी नद्यांच्या पातळीवरच प्लास्टिकचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असून, हे डिझाइन पेटंट उपकरणाच्या प्रत्यक्ष निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले मोठे पाऊल आहे. या संशोधनामुळे भविष्यात नदी प्रदूषण नियंत्रणाच्या मोहिमेला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे संशोधक डॉ. पांडुरंग पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी