
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लशीचा डोस पाजून रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात ५८ हजारांहून अधिक बालकांना डोस देण्याचे नियोजन आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाच वर्षांपर्यंतच्या एकूण ५८ हजार ८१५ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असून, त्यांपैकी ग्रामीण भागातील बालकांची संख्या ५६,६२९, तर शहरातल्या बालकांची संख्या २,१८६ आहे. लसीकरणासाठी एकूण १,६५९ बूथ सज्ज असून, ३,४७७ कर्मचारी आणि ३४६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी १५० मोबाइल टीम्स कार्यरत असून, प्रवासात असलेली मुलेही लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून ३४ ट्रान्झिट टीम्सही सज्ज आहेत.
या लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस आरोग्य पथके एकूण चार लाख ३८ हजार घरांना भेट देणार असून, लसीकरण न झालेल्या मुलांचे लसीकरण करणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने १९८८मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रात १९९५ पासून ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. मार्च २०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हाच स्तर कायम राखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
जिल्ह्यातील पालकांनी पाच वर्षांखालील आपल्या प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून, या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या संकल्पात आपला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने लसवाहक, बर्फाची पाकिटे आणि शीतसाखळी व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी