
सोलापूर, 28 जून (हिं.स.)।महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानाच्या अनुषंगाने सोलापूर शहर व जिल्हा (पूर्व) काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सोलापूर जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी BLA-2, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
या तीन दिवसीय प्रशिक्षण मालिकेअंतर्गत आज २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर काँग्रेस भवन, सोलापूर येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षिका रोहिणी धोत्रे यांनी एसआयआर प्रक्रियेची सविस्तर माहिती देत मतदार नोंदणी, पडताळणी, दुरुस्ती, नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले.शिबिराचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले, तर दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भीमाशंकर जमादार आणि उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेकडे काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सोलापूर जिल्हा, लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक मतदान केंद्रावर काँग्रेसचे मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) यांनी मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांच्याशी प्रभावी समन्वय ठेवून काम करावे. मतदार यादीत पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित किंवा सातत्याने गैरहजर असलेल्या व्यक्तींची नावे नियमांनुसार वगळणे, चुकीच्या अथवा दुबार नोंदी दुरुस्त करणे आणि संपूर्ण प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मतदार यादी ही लोकशाहीची आत्मा असून तिची अचूकता आणि विश्वासार्हता जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आजपासून तीन दिवस सोलापूर जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवरील BLA प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्येक प्रतिनिधीने तळागाळापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोप केला की, काँग्रेस, पुरोगामी, विरोधी पक्षांच्या विचाराचे मतदार वगळण्याचे कट कारस्थान एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून भाजप करत असून बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेस व पुरोगामी विचारांच्या मतदारांची नावे भाजपच्या कारस्थानामुळे, तांत्रिक कारणांमुळे किंवा दुर्लक्षामुळे वगळली जाणार नाहीत, याची प्रत्येक कार्यकर्त्याने दक्षता घ्यावी.
भाजपला जनतेच्या हिताशी त्यांच्या अडचणीशी, विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही फक्त जाती धर्माचे राजकारण करत असते. म्हणून लोकशाही, संविधान आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सक्षम व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड