लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी
मुंबई, 28 जून (हिं.स.)। मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत
Railway Police Decision Passenger Bag Checks at Stations


मुंबई, 28 जून (हिं.स.)। मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या झाल्यानंतर रेल्वे पोलीस दलाने स्थानकांवरील सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पाठीवरील बॅगांची हाताने तपासणी केली जाणार असून ही मोहीम सीसीटीव्ही देखरेखीखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार आहे.

उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशाची बॅग स्कॅनरमधून तपासणे शक्य नसल्याने हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. किरकोळ वादातून धारदार शस्त्रांचा वापर होण्याच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. कामगारांनी आपल्या कामासाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारे किंवा साधने रेल्वे प्रवासादरम्यान सोबत न नेता ती कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहनही रेल्वे पोलिसांनी केले आहे. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी बोरीवली स्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच प्रवासी संघटनांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.

या हत्येनंतर रेल्वे पोलीस प्रशासनातही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय खोपिलकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कल्याण रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील काही रेल्वे पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

24 जून रोजी चर्चगेट–नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून मयंक लोहार याची चाकूने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्ण याने हल्ल्यानंतर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला कुर्ला परिसरातून अटक केली. या घटनेनंतर लोकल प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

दरम्यान, माहिम रेल्वे स्थानकाबाहेरही धक्काबुक्कीच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande