
नांदेड, 28 जून (हिं.स.)।
शिवसेना (यूबीटी) पक्षाचे जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर टीका केली. जनतेच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला. खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले. विधान परिषद निवडणुकीनंतर काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर किनवट येथील नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खराटे बोलत होते.
पुढे खराटे म्हणाले, खासदार आष्टीकर यांचा पक्षांतराचा निर्णय मतदारसंघाच्या विकासासाठी नसून वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी दिवंगत प्रदीप नाईक यांनी मोठे योगदान दिले होते. मतदारसंघातील विकासकामांसाठी उपलब्ध असलेला १५ कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित असल्याचाही आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख मारोती दिवसे, शहरप्रमुख प्रशांत कोरडे, बांधकाम सभापती श्रीराम नेमानिवार, माजी शहरप्रमुख संतोष येलचलवार आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis