
सोलापूर, 28 जून (हिं.स.)।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भक्ती, संस्कार आणि सामाजिक जनजागृतीचा संगम घडविणारा अनोखा उपक्रम सोलापुरात पार पडला. हरीपाठ परिवाराच्या वतीने कोकणकडा मित्र मंडळ रायगड आणि रायगड प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्याभिषेक सोहळ्याच्या सेवाभावी उपक्रमात १५० महिला, ५० युवती आणि ५० पुरुषांनी सामूहिक हरीपाठ करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी भक्तिमय वातावरणात शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेशही देण्यात आला.
बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात केवळ धार्मिक उपक्रमावर भर न देता समाजहिताचे संदेशही गायनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. 'निसर्ग वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करा' या विषयांवर आधारित संदेशपर रचना सादर करण्यात आल्या. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाची गरज आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी याविषयी उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोकणकडा मित्र मंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार, रायगड प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष शिवाजी (भाऊ) भोसले तसेच हरिभक्तिपरायण सुधाकर इंगळे महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले. विविध भागांतील हरीपाठ परिवाराच्या शाखांमधील भाविकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. निराळे वस्ती, डुमणे नगर (बाळे), संत गोरोबाकाका महिला भजनी मंडळ (लष्कर) आणि स्वागत नगर येथील महिला-पुरुष भाविकांनी उत्साहाने उपस्थिती लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड