
सोलापूर, 28 जून (हिं.स.)।
: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), करमाळा या संस्थेचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर’ असे नामकरण करण्यात येत असून, त्यानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नामांतर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जनप्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या नामांतरामुळे राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य आणि युवक घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ संघ प्रचारक मदनदास देवी यांच्या कार्याचा गौरव होणार असून, भावी पिढीला त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सर्व संबंधितांनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मदनदास गोवर्धनदास देवी(९ जुलै १९४२ - २४ जुलै २०२३)
श्री. मदनदास गोवर्धनदास देवी (मदनजी) यांचा जन्म करमाळा, जिल्हा सोलापूर येथे झाला. करमाळा आणि पुणे येथे एलएलबी आणि सीए पदवी प्राप्त केल्यानंतर सुमारे ६० वर्षांच्या काळातील आपले जीवन त्यांनी सामाजिक कार्यासाठी संपूर्णपणे समर्पित केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी-युवा संघटनेचे राष्ट्रीय संघटन मंत्री या नात्याने सत्तावीस वर्षे त्यांनी देशभरातील विद्यार्थी वर्गाचे नेतृत्व केले.
आणिबाणी विरुद्ध संघर्ष, आसाम येथील परकीय घूसखोरी विरुद्ध दहा हजार विद्यार्थ्यांचा सत्याग्रह, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्ध हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा मार्च यासारख्या राष्ट्रीय आंदोलनांमध्ये देशातील तरुण विद्यार्थी वर्गाचे त्यांनी समर्थ नेतृत्व केले.
आणीबाणीच्या काळात काही काळ कारावासही भोगला. १९९२ पासून अखेर पर्यंत तीस वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह पदाचे दायित्व सांभाळत असतानाच समाजातील विविध संघटनांचे जसे कि, भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, दीनदयाळ शोध संस्थान, विदेशातील सामाजिक काम अशा विविध कामांचा समन्वय आणि मार्गदर्शनाचे काम त्यांनी कौशल्याने केले. वयाच्या ८१ व्या वर्षी बंगळुरू येथे त्यांचे देहावसान झाले. समाजातील हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रीय कार्याची प्रेरणा श्रीमान मदनदास देवी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड