राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, 28 जून (हिं.स.) भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day - NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साह
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद


अमरावती, 28 जून (हिं.स.)

भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day - NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ लसीकरण बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विशेष भ्रमणशील पथकांच्या माध्यमातून ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सौ. सुलभाताई खोडके, माजी पालकमंत्री ॲड. यशोमतीताई ठाकुर, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, सन्मा. नगरसेवक व नगरसेविका, उपायुक्त योगेश पीठे यांनी विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देऊन मोहिमेची पाहणी केली. त्यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांशी संवाद साधत प्रत्येक बालकाला पोलिओची लस देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळपासूनच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय ज्या बालकांपर्यंत बूथवर येणे शक्य झाले नाही, अशा बालकांसाठी विशेष पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन लसीकरण करण्यात आले. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर, वीटभट्ट्या, झोपडपट्ट्या, भटक्या-विमुक्त समाजाची वस्ती तसेच बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील बालकांना लसीकरणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.महानगरपालिका प्रशासनाने या मोहिमेसाठी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले. शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मोहिमेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने देखरेख करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande