दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी : अभाविप
नाशिक, 28 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अवघ्या काही तासांवर आली असताना संभाव्य पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलावी लागल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना राज्याच्या परीक्षा व्यवस
दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करावी : अभाविप


नाशिक, 28 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अवघ्या काही तासांवर आली असताना संभाव्य पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलावी लागल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना राज्याच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने खेळ करणारी असल्याची टीका अभाविपने केली आहे.

अभाविपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून परीक्षेची तयारी करत असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली जाणे हे केवळ प्रशासकीय अपयश नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरणारे आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा हा खेळ आता थांबविण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अभाविपने राज्य शासनाकडे टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, परीक्षेची नवीन तारीख विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने जाहीर करावी, विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त आर्थिक व मानसिक भार कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि राज्यातील सर्व स्पर्धा व पात्रता परीक्षांसाठी स्वतंत्र, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित व सुरक्षित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली तातडीने लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अशा घटना दुर्देवी

अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले की, पुन्हा एकदा पेपरफुटीची घटना घडणे हे दुर्दैवी असून शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस, परिणामकारक आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande