
गुरुद्वारा गुप्तसर साहेब येथे देशभरातील हजारो भाविकांची गर्दी
मनमाड, 28 जून (हिं.स.)।
- शिख धर्मीयांचे सहावे गुरु, धन धन श्री गुरु हरगोबिंद साहेब यांची ५५७ वी प्रकाश पर्व जयंती आज मनमाड शहरात अत्यंत उत्साहात, पारंपरिक थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने येथील ऐतिहासिक आणि पवित्र गुरुद्वारा गुप्तसर साहेब येथे गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी केवळ स्थानिक पातळीवरूनच नव्हे, तर संपूर्ण देशभरातून हजारो शिख बांधव आणि भाविकांनी मनमाडमध्ये हजेरी लावली होती.
प्रकाश पर्व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा गुप्तसर साहेब परिसराला अतिशय आकर्षक आणि नयनरम्य अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून गुरुद्वारात अखंड पाठ, भव्य सत्संग आणि मधुर भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. या धार्मिक उपक्रमांमध्ये लीन होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. तसेच गुरुद्वारात २४ तास सुरू असलेल्या 'लंगर' (महाप्रसाद) सेवेचा लाभ हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तीत घेतला.या संपूर्ण उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे आज काढण्यात आलेली भव्य नगर कीर्तन रॅली. थोर धार्मिक व्यक्तिमत्त्व बाबा रणजित सिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती. येथील 'छोटा गुरुद्वारा' येथून या भव्य रॅलीची सुरुवात झाली.रॅलीमध्ये गुरु ग्रंथ साहेब पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि नतमस्तक होऊन गुरुजींना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. शिख बांधवांच्या पारंपरिक युद्धकलेची (गटका) प्रात्यक्षिके आणि 'वाहेगुरु'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मनमाड नगरी झाली 'गुरुमय'
गुरु हरगोबिंद साहेब यांच्या शांतता, त्याग आणि शौर्याच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी आयोजित या त्रिदिवसीय प्रकाश पर्व सोहळ्याने संपूर्ण मनमाड नगरी गुरुमय आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती. उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी गुरुद्वारा कमिटी व स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV