
अमरावती, 28 जून (हिं.स.) | जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या दडीमुळे चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी सुधारली आहे. २७ जूनपर्यंत जिल्ह्यात सामान्य १३१.१ मिमी पावसाच्या तुलनेत १०१.६ मिमी, म्हणजेच ८२.२ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४८.४ मिमी १११.९ टक्के पाऊस झाला होता.
जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक १६६.३ मिमी १२३.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, सामान्य सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला हा जिल्ह्यातील अव्वल तालुका ठरला आहे. त्यापाठोपाठ अंजनगाव सुर्जी येथे ११४.४ मिमी ११७.६ टक्के, दर्यापूर येथे ९७.२ मिमी, ९९.८ टक्के, धारणी येथे १४२.७ मिमी, ९५ टक्के, मोर्शी व वरूड येथे प्रत्येकी ९४.४ टक्के, तर चांदूर बाजार येथे ९३.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी ८३.२ मिमी, ४८ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.
याशिवाय अचलपूर ५८.८ टक्के, भातकुली ६०.१ टक्के, धामणगाव रेल्वे ६०.८ टक्के आणि तिवसा ६७.१ टक्के तालुक्यांमध्येही अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. २७ जून रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात एका दिवसात ७.० मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. त्यात धारणी १६.६ मिमी, मोर्शी १४.६ मिमी, वरूड १४.३ मिमी आणि तिवसा १३.६ मिमी येथे तुलनेने अधिक पाऊस झाला. पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत असली, तरी काही तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची आवश्यकता कायम आहे.
----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी