दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करावी - अभाविप
लातूर, 28 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अवघ्या काही तासांवर असताना संभाव्य पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि राज्याच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर
टीईटी परिक्षा


लातूर, 28 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अवघ्या काही तासांवर असताना संभाव्य पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि राज्याच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. लाखो विद्यार्थी अनेक महिन्यांपासून परिश्रमपूर्वक परीक्षेची तयारी करत असताना अशा प्रकारे परीक्षा पुढे ढकलली जाणे हे केवळ प्रशासकीय अपयश नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरणारे आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने होणारा हा खेळ आता थांबणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात विविध भरती, प्रवेश आणि पात्रता परीक्षांमध्ये पेपरफुटी व इतर गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे. राज्यातील एमएचटी-सीईटी, आरोग्य विभाग भरती, शिक्षक पात्रता परीक्षा यांसारख्या प्रकरणांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील NEET-UG आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकारांपर्यंत अनेक घटनांनी परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत केला आहे. प्रत्येक घटनेनंतर चौकशी आणि कठोर कारवाईची घोषणा केली जाते; मात्र अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत असल्याने शासनाची प्रतिबंधात्मक यंत्रणा आणि परीक्षा सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे स्पष्ट होते.

राज्य शासन आणि शिक्षण विभागाने परीक्षा प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षितता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यात अपयश आले आहे. प्रश्नपत्रिका तयार होण्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल ट्रॅकिंग, मजबूत सायबर सुरक्षा, अधिकाऱ्यांची स्पष्ट जबाबदारी आणि स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. केवळ दोषींना अटक करून ही समस्या संपणार नाही, तर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी संरचनात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. या पेपर लीक प्रकरणात दोषी वर योग्य ती कारवाई करावी, या संदर्भात आज अभाविप उदगीर च्या वतीने छ.शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.

अभाविप उदगीर राज्य शासनाकडे मागणी करते की, टीईटी पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय,निष्पक्ष आणि विहित वेळेत चौकशी करून या संपूर्ण रॅकेटमधील प्रत्येक दोषीवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.परीक्षेची नवीन तारीख विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने जाहीर करावी, विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त आर्थिक व मानसिक भार कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि राज्यातील सर्व स्पर्धा व पात्रता परीक्षांसाठी स्वतंत्र, पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली तातडीने लागू करावी. आणि शासनाने पुन्हा असे पेपर फुटी होणार नाही, यासाठी योग्य ती यंत्रणा कामी लावावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande