
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे (ता. संगमेश्वर) सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ पार पडला. तळेकांटे ग्रामस्थांच्या पुढाकाराने महामार्गाशेजारी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा प्रारंभ झाला.
महामार्गाच्या विकासासोबतच निसर्गाचा समतोल राखणे आणि या परिसराचं सौंदर्य वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास होत असताना पर्यावरणाची हानी टाळणे किंवा ती भरून काढणे तितकेच गरजेचे आहे. महामार्ग तयार करताना ज्या झाडांची हानी झाली, त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. हा हरित महामार्ग करण्याचा शासनाचा निर्धार असून, सर्वांच्या सहकार्याने हा संपूर्ण परिसर अधिक सुंदर आणि हिरवागार बनेल, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
या उपक्रमावेळी बंड्याशेठ साळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळेकांटे गावाच्या सरपंच सुषमा बने यांच्यासह तळेकांटे गावाचे ग्रामस्थ व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी