
लातूर, 28 जून (हिं.स.)पोलिओ लसीकरणामुळे लहान बालकांचे आरोग्य सुरक्षित राहते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ लस देऊन त्यांचे आरोग्य अबाधित ठेवावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जाधव, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, लहान मुले हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लस पाजावी आणि आरोग्य विभागाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. आरोग्य विभागानेही पात्र बालकांना पोलिओचे डोस देण्यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आल्याचे सांगत, कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis