
कोल्हापूर, 28 जून (हिं.स.)। नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी येथे केले. श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकताच मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक दर्जा मिळाला. त्यानिमित्त आनंद भवन सभागृह येथे आनंदोत्सव आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, देशभरातील एकूण बँकांच्या तुलनेत वीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही आजच्या घडीला विशेष अभिनंदनाची बाब आहे. कारण कोविड, युक्रेन-रशिया युद्ध, अमेरिका-लढाई अशी विविध कारणांचा प्रत्येक क्षेत्राला परिणाम करणाऱ्या परिस्थितीही वीरशैवची कामगिरी उठावदार अशी आहे. उत्पादन, सेवा आणि शेती अशा तीनही क्षेत्रात देशाची आर्थिक कामगिरी उत्तम आहे. एल निनोचा थोडाफार प्रभाव पडेल.
ते म्हणाले, भारतीय गुंतवणूक वाढते आहे. निर्यातही वाढते आहे. ६८० मिलियन डॉलरची गंगाजळी आहे. अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना चांगले दिवस आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषता कोल्हापुरात निर्यात वाढते आहे. अशावेळी वीरशैव बँकेला आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यास अजूनही खूप वाव आहे. नागरी सहकारी बँका देशाच्या विकासात दीर्घकाळ टिकणारे आणि सर्वांना योग्य न्याय देणारे योगदान देऊ शकतात. हत्तरगी मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी आशीर्वचन केले. व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सतीश घाळी यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, बँकेच्या आजच्या समृद्धीत त्याग, परंपरा दडलेली आहे. बँकेच्या प्रत्येक आजी-माजी घटकाने दिलेल्या योगदानावर आज बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला. ४ फेब्रुवारी १९४२ रोजी एका बँकेवर सुरू झालेला आजचा विस्तार ३१ शाखा, तीन राज्यांपर्यत पोहचला आहे.
यावेळी राज्य सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुरेश कुराडे, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, गजानन सुलतानपुरे, सरलाताई पाटील, बँक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह बँकेचे आजी-माजी संचालक, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar