मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट
रायगड, 28 जून (हिं.स.)। : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात ''विशेष सखोल पुनरीक्षण २०२६'' (SIR) मोहीम राबविण्यात येत असून, मतदारयादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधि
Voter list revision gathers pace; BLOs to conduct house visits starting June 30.


रायगड, 28 जून (हिं.स.)। : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम राबविण्यात येत असून, मतदारयादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घराला भेट देणार आहेत.

या शासकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी केले आहे.

या मोहिमेदरम्यान बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन विहित नमुन्यातील अर्ज देतील आणि मतदारांची माहिती भरून घेतील. नोकरी अथवा अन्य कारणांमुळे संबंधित मतदार घरी उपस्थित नसल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक आवश्यक माहिती देऊ शकतात तसेच मतदाराच्या वतीने गणना प्रपत्रावर स्वाक्षरीही करू शकतात. त्यामुळे केवळ या प्रक्रियेसाठी नोकरदारांना सुट्टी घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

प्रशासनाने या मोहिमेत डिजिटल सुविधेलाही प्राधान्य दिले आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ, Voter Helpline किंवा ECINET मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपले नाव तपासता येणार आहे. तसेच मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्याबाबतचे दावे व हरकती ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन दाखल करता येणार आहेत.

याशिवाय विविध राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) देखील नागरिकांना या प्रक्रियेत सहकार्य करणार आहेत. नागरिकांनी डिजिटल सुविधांचा लाभ घेत मतदारयादीतील माहिती अचूक ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande