रत्नागिरी : वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन सुरू झाले आहे. महिलांना वयाच्या एका टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर (Menopause) अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा स
रत्नागिरी : वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन


रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन सुरू झाले आहे.

महिलांना वयाच्या एका टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर (Menopause) अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी फारशी जागरूकता नसते आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळणेही कठीण होते. हीच गरज ओळखून डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर सखोल मार्गदर्शन, समुपदेशन आणि विशेष उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली दामले यांची सेवा उपलब्ध झाली आहे.

डॉ. दामले यांनी याविषयी बोलताना सांगितले की, रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात अनेक संप्रेरकीय बदल होतात. यामुळे त्यांना निद्रानाश, अस्वस्थता, चिंता, सतत सुस्ती येणे आणि हाडे ठिसूळ होणे अशा समस्या भेडसावतात. या बदलांचा थेट परिणाम महिलांच्या हृदयावरही होऊ शकतो. परंतु या काळात योग्य वैद्यकीय सल्ला, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीची काळजी घेतल्यास स्त्रियांना या त्रासापासून नक्कीच आराम मिळू शकतो.

शहरी भागामध्ये अशा आजारांवर वैद्यकीय सल्ला आणि उपचार सहज उपलब्ध होतात, मात्र ग्रामीण भागातील महिला या उपचारांपासून आणि योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहतात. ग्रामीण भागातील माताभगिनींना या संदर्भातील सर्व योग्य सल्ला एकाच छताखाली मिळावा आणि त्यांचे आरोग्य सुधारून जीवनमान उंचावावे, या सामाजिक हेतूने वालावलकर रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे. येथे महिलांसाठी विशेष समुपदेशन सत्रे देखील आयोजित केली जात आहेत.

ग्रामीण भागातील महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या त्रासांना त्या वाढत्या वयाची लक्षणे समजून सहन करत राहतात. महिलांनी आपल्या आरोग्याशी तडजोड न करता या सुविधेचा लाभ घ्यावा. डॉ. सौ. दामले या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी या मोफत समुपदेशन आणि उपचार सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande