
बीड, 28 जून (हिं.स.)।
केज तालुक्यातील टाकळी येथे काल विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांनी आज पीडित घुले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या प्रकरणातील पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. घुले यांच्या कुटुंबीयांनी मांडलेली व्यथा ऐकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला. या गुन्ह्यात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली असली, तरी मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार धनंजय मुंडे यांनी थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरत विचारले, एसटी समाजातल्या एका उमेश माने याला मारण्यासाठी प्लॅन केला होता. परंतु, या प्रकरणातील जे काही पुरावे आणि साक्ष आहेत, ते नष्ट करण्यासाठी मुख्य आरोपीला बाहेर ठेवण्यात आले आहे का? हा माझा पहिला प्रश्न पोलीस प्रशासनाला आहे. नऊ आरोपी पकडले असताना, या एकाच व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलीस का घाबरत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोपी हा मोठ्या घराण्यातील असल्यामुळेच पोलीस त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करताना मुंडे म्हणाले की, आतापर्यंत बीड जिल्ह्यात २२ खून झाले आहेत. देशात कुठेही नसेल एवढी भयानक परिस्थिती आज बीडमध्ये निर्माण झाली आहे. या प्रकरणात पोलिसांवर पूर्ण संशय असून, ते एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही गप्प बसणार नाही, पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला. टाकळी आणि कदमवाडी येथील सामाजिक सलोखा कायम ठेवून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis