
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात तीन दिवस दडी मारलेल्या पावसाने काल संध्याकाळपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडला. आज (२९ जून २०२६) सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये सरासरी १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या २४ तासांत सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस खेडमध्ये, तर त्याखालोखाल प्रत्येकी १३० मिलिमीटर पाऊस दापोली आणि मंडणगडमध्ये पडला. चिपळुणात ११६, संगमेश्वरमध्ये १०२, गुहागरमध्ये ९३, लांज्यात ९१, तर राजापुरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
खेड आणि मंडणगडमध्ये जास्त पाऊस झाला असून खेडमधील भरणे पुलाजवळ जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. इशारा पातळी पाच मीटर असून, आज सकाळी आठ वाजता पाणीपातळी ४.६० मीटर एवढी होती. २६ जूनला पाणीपातळी ३.५० मीटर होती. पाऊस सतत चालू राहिला, तर पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढत असली, तरी अजून इशारा पातळीपर्यंत पाणी वाढलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी