रत्नागिरी : निवळी येथे दरड कोसळल्याने दोन घरांना धोका
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी (ता. रत्नागिरी) येथील कोकजेवठार भागात काल रात्री दरड कोसळल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने दरड कोसळत असताना त्या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना ट
रत्नागिरी : निवळी येथे दरड कोसळल्याने दोन घरांना धोका


रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी (ता. रत्नागिरी) येथील कोकजेवठार भागात काल रात्री दरड कोसळल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने दरड कोसळत असताना त्या ठिकाणाहून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. निवळी येथील कोकजेवठार परिसरात रहिवासी जयसिंग सुर्वे आणि सुरेश सुर्वे यांच्या घरालगतची दरड अचानक कोसळली. महामार्गासाठी डोंगर कापून रस्ता रुंद करण्यात आल्यानंतर ही घरे थेट उताराच्या कडेला आली असून, आता त्यांच्यावरील धोका अधिकच वाढला आहे. उतारांना पुरेशी संरक्षक भिंत, जलनिस्सारण व्यवस्था आणि आवश्यक स्थिरीकरणाची कामे वेळेत झाली नसल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार राजाराम म्हात्रे, महामार्ग विभागाचे अधिकारी कुलकर्णी, पोलीस पाटील, सरपंच तसेच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. दरडीखाली आलेली माती व दगड हटविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

केवळ दरड हटविण्यावर न थांबता संपूर्ण परिसरातील उतारांचे तांत्रिक परीक्षण करून कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande