
लातूर, 29 जून (हिं.स.)।
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा महासोहळा. लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम चा जयघोष करत पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनासाठी पायी आणि विविध वाहतुकीच्या माध्यमातून पंढरीकडे मार्गस्थ होतात. यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी होत असून, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लातूर आणि पंढरपूरदरम्यान अनरक्षित आषाढी विशेष रेल्वेच्या ८ फेऱ्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूरसह परिसरातील हजारो वारकऱ्यांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. लातूर जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने दरवर्षी आषाढी
वारीसाठी पंढरपूरला जातात. खासगी वाहनांवरील ताण कमी करण्याबरोबरच एसटी बसवरील गर्दीही कमी करण्यास या विशेष रेल्वेची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, खर्च आणि गैरसोयही कमी होणार आहे.
विशेष रेल्वेला हरंगुळ, औसा रोड, मुरूड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री,
कुडुवाडी आणि मोडनिंब या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे लातूरसह धाराशिव जिल्ह्यातील भाविकांनाही या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. रेल्वेची रचना देखील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन करण्यात आली आहे. गाडीत ९ शयनयान (स्लीपर) आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, तसेच २ लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन
असा एकूण १७ डब्यांचा समावेश आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांना वेळेत आरक्षण करण्याचे तसेच अनरक्षित तिकीटांसाठी रेल्वे स्थानकावरील बुकिंग काउंटर किंवा रेल-वन (-) अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या माध्यमातून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाच्या आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होणार असल्याने या विशेष रेल्वेमुळे वारकऱ्यांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार असून, विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा एक महत्त्वाची सुविधा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis