
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ हजार ४७ शेतकरी खातेदारांना लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.
गेल्या २ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी आणि सहकार मंत्री उपसमितीचे सदस्य आहेत तर सहकार विभागाचे प्रधान सचिव उपसमितीचे सदस्य सचिव आहेत.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील ८ हजार ४७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या अशी - मंडणगड 460, दापोली 848, खेड 708, चिपळूण 1150, गुहागर 857, संगमेश्वर 1065, रत्नागिरी 546, लांजा 1173, राजापूर 1240.
जिल्ह्यातील अन्य बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांची खाती तपासण्याची तसेच अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी