अहेरी पाच डॉक्टरांचे राजीनामे, 'ताला ठोको' आंदोलनाने प्रशासनाला धक्का
आदिवासी भागात महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवा संकटात गडचिरोली, 29 जून (हिं.स.) : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वाढत्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून, त्यातच पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर ब
रुग्णालयाच्या समस्या विरुद्ध आंदोलन करताना


आदिवासी भागात महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवा संकटात

गडचिरोली, 29 जून (हिं.स.) : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वाढत्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली असून, त्यातच पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रुग्णालयासमोर ‘ताला ठोको’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदविला. आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार रिक्त पदांची भरती तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन छेडले. नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी २८ जूनपर्यंत पदभरती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. डी. मडावी यांनी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या माध्यमातून आरोग्य उपसंचालकांशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात चार डॉक्टरांना डेप्युटेशनवर पाठविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, आंदोलकांनी तात्पुरत्या उपायांऐवजी शासन नियमानुसार कायमस्वरूपी पदभरती करण्याची मागणी कायम ठेवली.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली. हे राजीनामे वैयक्तिक कारणांमुळे आहेत की कार्यस्थळावरील समस्यांविरोधातील सामूहिक निषेधाचा भाग आहेत, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टरांना निवास, भोजन तसेच मोबाईल नेटवर्कसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. या समस्या सोडवण्याऐवजी कारवाईची भीती दाखवली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे दुर्गम भागात डॉक्टर टिकून राहण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

आंदोलनात राहुल दुर्गे, अमोल रामटेके, सुमित मोतकूरवार, स्वप्नील श्रीरामवार, इम्मा शेख, प्रभाकर कुसराम, रवी पेद्दल, शाहरुख शेख, अभिषेक दोंतुलवार, शंकर कटलावर, गोपाल पुसलवार, दीपक तुमावार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासकीय धोरणांचा निषेध करतो, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, डॉक्टरांच्या राजीनाम्यांची चौकशी होणार का आणि रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न कायमस्वरूपी कधी मार्गी लागणार, याकडे अहेरीसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande