
डोंबिवली, 29 जून (हिं.स.)। एमआयडीसी निवासी मध्ये किरकोळ पावसाच्या सरीत झाडे पडण्याचे सत्र चालू असून आज सोमवारी सकाळी गणपती मंदिर रस्त्यावरील सागर सोसायटी ( RH - 91/92 ) समोर एक कडुलिंबाचे मोठे झाड कोसळल्याने महावितरणचा पोल रस्त्यावर पडला. सुदैवाने झाड व पोल पडल्यावर कोणतीही हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन पडलेले झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला तर महावितरण कर्मचाऱ्यांनी येऊन खंडीत झालेला वीज पुरवठा चालू केला.
नुकतेच काही दिवसांपूर्वी एमआयडीसी निवासी मध्ये पहिल्याच पावसात एकाच दिवशी पाच झाडे पडली होती. त्यात बहुतेक झाडे गुलमोहरची होती. परंतु आज पडलेले झाड हे मजबूत खोड असलेले कडुलिंबाचे होते. सर्व ही पडलेली झाडे रस्त्याच्या कडेला होती. बहुतेक रस्ते काँक्रिटचे झाल्याने त्यानंतर गटारीची कामे केल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मूळ आणि खोडाला धक्के बसल्याने तसेच त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्याने ही झाडे आता थोड्या पावसात कोसळत असावी. प्रशासनाने आता निवासी भागातील अशा झाडांचे सर्वेक्षण करावे जेणेकरून भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घ्यावी असे येथील नागरिक सांगत आहेत.
-----------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi