३० जूनपासून BLO करणार घरोघरी भेटी; नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे
रायगड, 29 जून (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यात ''विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ (SIR)'' मोहीम ३० जून ते २९ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, या मोहिमेंतर्गत माहिती संकलनासाठी घरोघरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अ
BLOs-to-conduct-door-to-door-v


रायगड, 29 जून (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ (SIR)' मोहीम ३० जून ते २९ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, या मोहिमेंतर्गत माहिती संकलनासाठी घरोघरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व अन्य शासकीय प्रतिनिधींना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार रोहा डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी BLO अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणार आहेत. या काळात नोकरी किंवा अन्य कारणामुळे मतदार घरी उपस्थित नसल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य अथवा नातेवाईक आवश्यक माहिती देऊ शकतील तसेच गणना प्रपत्रावर स्वाक्षरीही करू शकतील. त्यामुळे नोकरदार नागरिकांना विशेष सुट्टी घेण्याची गरज भासणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेत डिजिटल सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना voters.eci.gov.in, Voter Helpline किंवा ECINET या माध्यमातून स्वतःचे नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा वगळण्याबाबतचे दावे व हरकती ऑनलाइन पद्धतीने दाखल करता येणार आहेत.

या प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) देखील सहकार्य करणार असून स्थानिक पातळीवर मतदार पडताळणीचे काम अधिक सुलभ होणार आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३० जून ते २९ जुलैदरम्यान BLO गृहभेटी देतील, ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. त्यावरील निर्णय ३ ऑक्टोबरपर्यंत घेऊन ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय मोहिमेत नागरिकांनी आपल्या कुटुंबाची अचूक माहिती शासकीय प्रतिनिधींना देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande