बदनापूर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा
दीर्घकालीन पाणीटंचाई निवारणासाठी विविध योजनांवर सकारात्मक चर्चा छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.) : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोज
Q


दीर्घकालीन पाणीटंचाई निवारणासाठी विविध योजनांवर सकारात्मक चर्चा

छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.) : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदारसंघातील दीर्घकालीन सिंचन सुविधा आणि पाणीटंचाई निवारणाच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पश्चिम वाहिनी अथवा कोकणातील समुद्राकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अंबड आणि बदनापूर तालुक्यासाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत किमान पाच टीएमसी पाणी आरक्षित करून आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करत उपसा सिंचन योजना राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

तसेच बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान केटी वेअरचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जलसाठा वाढविणे आणि शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला.

पळसखेडा (ता. भोकरदन) येथील साठवण तलावातून कालवा किंवा बंदिस्त पाईपलाईनद्वारे बदनापूर मतदारसंघातील अवर्षणग्रस्त भागात पाणी पोहोचवून सिंचन क्षेत्र वाढविण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. याशिवाय सोमठाणा, वाला आणि राजेवाडी तलावांचे पाईपलाईनद्वारे एकत्रीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या तांत्रिक बाबी, व्यवहार्यता आणि पुढील कार्यवाहीबाबतही आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव श्री. डवले, मुख्य अभियंता श्रीमती सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता श्रीमती पाटील तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande