लोकार्पणाच्या प्रतीक्षेत बडनेरा उड्डाणपूल; नागरिक त्रस्त
अमरावती, 29 जून (हिं.स.)। बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय औपचारिकतांमुळे रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पूल पूर्णपणे तयार असूनही तो सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्याने
लोकार्पणाच्या राजकारणात बडनेरेकर वेठीस!


अमरावती, 29 जून (हिं.स.)। बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय औपचारिकतांमुळे रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पूल पूर्णपणे तयार असूनही तो सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेत्यांच्या तारखेसाठी जनतेला वेठीस का धरले जात आहे? असा संतप्त सवाल बडनेरेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

दस्तुरनगर, एमआयडीसी, कोंडेश्वर मंदिर तसेच बडनेरा शहराला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. मात्र पूल सुरू नसल्यामुळे नागरिकांना रेल्वे गेटखालूनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, सकाळ-संध्याकाळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या अरुंद पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर दररोज किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका बडनेरा रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. ट्रॅफिकमध्ये अडकून अनेक प्रवाशांच्या गाड्या चुकत असून, रुग्णवाहिकाही वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नसल्याने गंभीर रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पूल पूर्ण झाल्यानंतरही केवळ उद्घाटनासाठी एखाद्या नेत्याची तारीख निश्चित होत नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल, तर उद्घाटनाच्या औपचारिकतेची वाट न पाहता तो तातडीने खुला करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

येत्या काही दिवसांत उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला नाही, तर तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा बडनेरा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. आता प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जनतेचा संताप लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेतात की, उद्घाटनाच्या राजकारणात नागरिकांची आणखी फरफट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande