अमरावती-बडनेरा परिसरातील ५ रेल्वे उड्डाणपुलांना केंद्र शासनाची मंजुरी
अमरावती, 29 जून (हिं.स.) शहरातील वाहतूक कोंडी, रेल्वे फाटकांवरील वारंवार होणारी अडचण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार रवी राणा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केलेल्या महत्त्वपूर्ण मागणीला अखेर यश आले आहे. के
अमरावती-बडनेरा परिसरातील ५ रेल्वे उड्डाणपुलांना केंद्र शासनाची मंजुरी


अमरावती, 29 जून (हिं.स.) शहरातील वाहतूक कोंडी, रेल्वे फाटकांवरील वारंवार होणारी अडचण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार रवी राणा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केलेल्या महत्त्वपूर्ण मागणीला अखेर यश आले आहे. केंद्र शासनाने अमरावती व बडनेरा परिसरातील ५ महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपूल (ROB) व ROB-cum-FOB प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे अमरावती शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात ऐतिहासिक भर पडणार असून नागरिकांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केले असून त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि आमदार रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाकडून या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे.केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावांनुसार अमरावती व बडनेरा परिसरात खालील पाच ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पार्वती नगर, अमरावती पार्वती नगर येथील शिवलीला मंगल कार्यालय परिसराला राज्य महामार्ग क्रमांक २०० शी जोडणाऱ्या मार्गावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.साई नगर, अमरावती साई नगर ते अकोली रोड या मार्गाला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. व बडनेरा शहराला अंतर्गत बायपास रोडशी जोडणारा महत्त्वपूर्ण रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. बडनेरा-अमरावती दरम्यान वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच शशी नगर – गोपाल नगर मार्गबडनेरा-अमरावती रेल्वे मार्गावर शशी नगर ते गोपाल नगर जोडणारा ROB-cum-FOB मंजूर करण्यात आला आहे. यामुळे वाहनांसोबतच पादचाऱ्यांनाही सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.त्याचप्रमाणे बडनेरा रोड – गोपाल नगर मार्ग बडनेरा रोड ते गोपाल नगर जोडणाऱ्या मार्गावर आणखी एक ROB-cum-FOB उभारण्यात येणार असून यामुळे परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.यामुळे अमरावती आणि बडनेरा परिसरातील अनेक रेल्वे फाटकांवर दिवसातून अनेक वेळा वाहतूक खोळंबते. रेल्वे गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. रुग्णवाहिका, शालेय वाहने, शेतकरी आणि व्यावसायिक यांनाही याचा मोठा फटका बसतो. प्रस्तावित उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर रेल्वे फाटकांवरील प्रतीक्षा संपुष्टात येऊन वाहतुकीचा वेग वाढणार आहे. तसेच इंधनाची बचत, वेळेची बचत आणि अपघातांमध्ये घट होण्यास मदत होणार आहे.अमरावती शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराला आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. याच उद्देशाने आमदार रवी राणा यांनी रेल्वे मंत्रालय, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे हे प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकले.या मंजुरीबाबत आनंद व्यक्त करताना आमदार रवि राणा म्हणाले की, अमरावती शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या या पाच उड्डाणपुलांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाले असून भविष्यातही अमरावतीच्या विकासासाठी मोठे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande