
चंद्रपूर, 29 जून (हिं.स.) : चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा गावातील वसाहतीत 28 जून 2026 रोजी घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेत पाच वर्षीय बालिकेवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत राज्य शासनाचे लक्ष वेधले.
या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा जलद, निष्पक्ष आणि प्रभावी तपास करून दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.
पीडित बालिकेला तातडीने वैद्यकीय उपचार, मानसोपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवणे, शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव