
लातूर, 29 जून (हिं.स.)। लातूर शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत पडून राहणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः अशोक हॉटेल ते जिल्हा परिषद मार्ग, दयानंद महाविद्यालय परिसर तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर दारूडे दारूच्या नशेत रस्त्यावरच झोपलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कामासाठी घराबाहेर पडल्याचे सांगून दिवसभर मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी पडून राहणाऱ्या व्यक्तींमुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेकदा अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून, शहराची प्रतिमाही मलिन होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.काही देशी दारू दुकाने, बार, परमिट रूम आणि बिअर शॉपी नियोजित वेळेपूर्वी सुरू होत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊनही प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय अवैध देशी दारू, विदेशी दारू, हातभट्टी दारू आणि इतर बेकायदेशीर मद्यविक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत पडून राहणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणे, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढणे, विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होणे आणि शहराच्या सामाजिक वातावरणाला धक्का बसणे हा लोकहिताचा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महानगरपालिकेने केवळ तक्रारींची नोंद घेण्यापुरते मर्यादित न राहता संयुक्त विशेष मोहीम राबवून उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री केंद्रांवर आणि अवैध दारू व्यवसायावर कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करणे ही काळाची गरज आहे. तसेच व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, पुनर्वसन आणि नियमित तपासणी यांनाही प्राधान्य दिल्यास समाजहित जपले जाईल आणि नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसंस्कृत वातावरण मिळेल.
दरम्यान, शहरातील सर्व देशी दारू दुकाने, बार, परमिट रूम आणि बिअर शॉपींच्या कामकाजाची विशेष तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित विभागांच्या कामकाजाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्य शासनानेही या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis