
मुंबई, 29 जून (हिं.स.) - देशभरात 'नीट' परीक्षेच्या घोळाचा अनुभव ताजा असतानाच, महाराष्ट्रात २८ जून रोजी झालेली 'टीईटी' (शिक्षक पात्रता परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या गंभीर प्रकरणावरून राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. या पेपरफुटीवर नियम २८९ अंतर्गत सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला सारून तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली.
नीट परीक्षा घोटाळ्याचे केंद्र महाराष्ट्र आणि त्यातही पुणे शहर होते. तिथे अनेकांना अटक झाली. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी सरकारने थेट भारतीय सैन्याची मदत घेतली होती. एका परीक्षेसाठी एवढी मोठी व्यवस्था उभी करावी लागत असताना, राज्य सरकारने स्वतः घेतलेल्या 'टीईटी' परीक्षेच्या वेळी साधी खबरदारी का घेतली नाही? असा सडेतोड प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
भिवंडी आणि इतर ठिकाणी टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असून, यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप दानवे यांनी केला. ते पुढे म्हणाले, उत्तम आणि आदर्श शिक्षक घडवणारी ही परीक्षा आहे. तिचाच जर असा लिलाव होत असेल, तर याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची दाट शंका आहे. राज्यात सातत्याने विविध परीक्षांचे पेपर फुटत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडला गेला आहे. शिक्षणमंत्री हे अपयश रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
राज्य सरकार ६ लाख विद्यार्थ्यांची एक परीक्षाही पारदर्शक आणि सुरक्षितपणे घेऊ शकत नसेल, तर ही राज्यासाठी मोठी नामुष्की आहे. सरकार एकीकडे शुद्ध प्रशासनाच्या गप्पा मारत असले, तरी प्रत्यक्षात मात्र सावळागोंधळ सुरू आहे, अशी बोचरी टीका दानवे यांनी केली.
विधान परिषदेचे सभापती स्वतः प्राध्यापक (शिक्षक) असल्याने त्यांनी राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली भूमिका मांडावी. तसेच, या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड, भ्रष्ट अधिकारी आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी नियम २८९ अंतर्गत तातडीने विशेष चर्चा घडवून आणावी, अशी आग्रही मागणी आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी