रत्नागिरी : दिशा परिवारातर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । गेल्या २० वर्षांपासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालू शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गुणवंत विद
रत्नागिरी : दिशा परिवारातर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत


रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । गेल्या २० वर्षांपासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालू शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी (शासकीय महाविद्यालय), आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच बारावीमध्ये किमान ८० टक्के गुण मिळविलेल्या गरजू विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. तसेच दहावीनंतर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीनुसार महाविद्यालयाची फी, राहण्याचा व जेवणाचा खर्च यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतमजूर, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थी तसेच पालक हयात नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी १ जुलै ते १२ जुलै असा असून, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रथम ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक ऑफलाइन अर्जावर नमूद करावा. त्यानंतर पीडीएफ स्वरूपातील अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून संपूर्ण माहिती भरावी. ऑनलाइन अर्ज https://dishapariwar.org.in/ या लिंकवरून भरावा.

अर्जासोबत भरलेला ऑफलाइन अर्ज, स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, इयत्ता १० वी/१२ वीची गुणपत्रिका (लागू असल्यास), प्रवेश पावती, महाविद्यालयाचे फी स्ट्रक्चर, आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, उत्पन्नाचा दाखला, शेतकरी असल्यास ७/१२ व ८-अ उतारा किंवा भूमिहीन दाखला, पालक हयात नसल्यास संबंधित प्रमाणपत्र तसेच वसतिगृहाची पावती किंवा प्रमाणपत्र (लागू असल्यास) जोडणे आवश्यक आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज स्पीड पोस्टाने दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, द्वारा अनंत रानडे, रानडे ब्रदर्स, २२ बाजारपेठ, राजापूर, जि. रत्नागिरी ४१६७०२ या पत्त्यावर पाठवावेत.

उपलब्ध निधीनुसार शैक्षणिक मदत दिली जाणार असून, मदत मंजूर अथवा नाकारण्याचे अंतिम अधिकार संस्थेकडे राखीव आहेत. अधिक माहितीसाठी गजानन जोशी (९४०५९ ५५६३६ किंवा ९८६००२१०८२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande