
लातूर, 29 जून (हिं.स.) :लातूर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या बांधकामामुळे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसीलच्या सुमारे 12 ते 13 फूट रुंद प्रवेशद्वारावर थेट छतावरून आणि बांधकाम भागातून पाणी कोसळत असल्याने येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अक्षरशः पावसात भिजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वकिल, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात प्रवेश करताना अंगावर पाणी पडत असल्याने पूर्णपणे ओले होऊनच आत जावे लागत आहे. यामुळे कार्यालयाच्या पायऱ्या व प्रवेशद्वार परिसर निसरडा झाला असून घसरण्याचा धोका वाढला आहे. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या परिस्थितीकडे संबंधित अधिकारी आणि बांधकाम ठेकेदार यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यामुळे सर्व भार थेट प्रवेशद्वारावर येत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या मते, या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असून बांधकाम चालू असतानाही सार्वजनिक सुविधांचा त्रास होऊ नये याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis