सिडको प्रभाग समितीच्या सभेमध्ये दोन नगरसेवकात खडाजंगी
नाशिक, 29 जून (हिं.स.) : सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या पहिल्याच सभेपूर्वी नागरिकांचा संताप उफाळून आला. नगरसेवक भूषण राणे यांनी महिला व नागरिकांसह थेट सभागृहाबाहेर मोर्चा काढत महापालिका प्रशा
Fight between two corporators


Fight between two corporators


नाशिक, 29 जून (हिं.स.) : सिडकोतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या पहिल्याच सभेपूर्वी नागरिकांचा संताप उफाळून आला. नगरसेवक भूषण राणे यांनी महिला व नागरिकांसह थेट सभागृहाबाहेर मोर्चा काढत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदविला.

पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. टँकरने पाणीपुरवठ्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात टँकर उपलब्ध होत नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी नगरसेवक भूषण राणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, “जोपर्यंत नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना सुरू असल्याचे आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पाणीपुरवठा, दूषित पाणी, ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई हे प्रमुख मुद्दे चर्चेत राहिले. अनेक नगरसेवकांनी सिडकोतील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची खंत व्यक्त केली. मिळणारे पाणी गढूळ व दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेवकांनी सिडकोतील 30 ते 35 वर्षे जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याची जोरदार मागणी केली. वाढत्या लोकसंख्येमुळे वारंवार चेंबर तुंबणे, ड्रेनेज लिकेज आणि सांडपाणी रस्त्यावर येणे या समस्या गंभीर झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासाठी नवीन डीपीआर तयार करून आधुनिक ड्रेनेज प्रणाली उभारण्याची मागणी करण्यात आली.

पावसाळा सुरू असूनही नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. कागदोपत्री काम न दाखवता प्रत्यक्ष नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सभेदरम्यान पाणी प्रश्नावरून नगरसेवकांमध्ये वादही निर्माण झाला. माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन शिवीगाळ झाल्याने काही काळ सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सभेला विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande