
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । नाचणे (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद वाडेकरवाडी आदर्श शाळेत युवा सेनेच्या युवती मैत्रीण उपक्रमातून विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शाळेत संगणक संच असूनही त्याचा उपयोग होत नव्हता. शाळेत हक्काची संगणक लॅब असूनही केवळ संगणक प्रशिक्षक नसल्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थी आधुनिक संगणक प्रशिक्षणापासून वंचित राहत असल्याचे युवासेनेच्या उप तालुका युवती अधिकारी पूजा ओंकार वाडेकर यांनी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या वतीने शाळेत 'युवती मैत्रीण' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नाचणे जिल्हा परिषद आदर्श शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून तज्ज्ञ प्रशिक्षक किंवा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, हे संगणक संच एका खोलीत बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञानही मिळत नसल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतला. केवळ प्रशिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहू नये, यासाठी युवासेनेच्या वतीने 'युवती मैत्रीण' उपक्रमातील प्रशिक्षित शिक्षिका या शाळेत पाठवली जाणार आहे. या प्रशिक्षिका शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शुल्काशिवाय, संपूर्णपणे मोफत संगणक प्रशिक्षण देणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी