
गडचिरोली, 29 जून (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात प्रशासकीय आदेशानुसार ९ जून २०२६ पासून सर्व रेतीघाट अधिकृतरीत्या बंद करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन, साठेबाजी आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री आणि रेती माफियांचे संगनमत असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
पवन गेडाम यांनी सांगितले की, गेल्या दोन ते अडीच महिन्यांत अवैध रेती उत्खननाशी संबंधित घटनांमध्ये दोन निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोंडाळा येथील सिनराई रेती घाटावर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या लोडर यंत्रांच्या साहाय्याने सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित प्रकरण आर्थिक तडजोड करून दडपण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच मृत्यूनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या हालचालींमुळे शवविच्छेदन प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनावर टीका करताना गेडाम म्हणाले की, ओव्हरलोड रेती वाहतूक करणारी वाहने प्रशासनाच्या नजरेसमोरून जात असतानाही प्रभावी कारवाई होत नाही. केवळ तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून वरिष्ठ अधिकारी जबाबदारी टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नैसर्गिक संतुलन बिघडत असून भूजल पातळी खालावत आहे. तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत, येत्या आठ दिवसांत अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक पूर्णपणे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पवन गेडाम यांनी दिला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond