
नाशिक, 29 जून (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे दुपारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सह प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्यांना भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारण्यात येत आहे. ही इमारत सर्वसुविधायुक्त असेल. नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तालुकास्तरावरील एवढी मोठी राज्यातील तालुकास्तरावरील पहिली इमारत ठरेल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभरात त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल. त्यामुळे या शहराचा जगभर नावलौकिक होईल. त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असेही नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी तहसीलदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV