
जळगाव, 29 जून (हिं.स.) सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (ता.), जळगाव कार्यालयामार्फत दि. २६ व २७ जून २०२६ रोजी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना विशेष मोहिमेअंतर्गत मत्स्यव्यवसायिकांसाठी जनजागृती व अर्ज भरणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ही शिबिरे हिवरामाता मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, खडकदेवळा (ता. पाचोरा), बिजासनीमाता मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, वाघुलखेडा (ता. पाचोरा), जोगमाया माता मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, वेरुळी बु. (ता. पाचोरा) तसेच बहुळामाई मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित, वेरुळी (ता. पाचोरा) येथे आयोजित करण्यात आली. शिबिरामध्ये मत्स्यव्यवसायिकांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, ई-श्रम कार्ड, GAIS तसेच NFDP अंतर्गत नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अर्ज भरून घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय अतुल पाटील यांनी उपस्थित मच्छीमारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया व मिळणारे लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली. या शिबिरास संबंधित संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने मत्स्यव्यवसायिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर