रत्नागिरीत २३ जुलैला लोकमान्य टिळक नाट्यप्रयोग
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जुलै रोजी रत्नागिरीत लोकमान्य टिळक या नाट्यप्रयोगाचे आयोजन राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक यांना आधुनिक भार
रत्नागिरीत २३ जुलैला लोकमान्य टिळक नाट्यप्रयोग


रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जुलै रोजी रत्नागिरीत लोकमान्य टिळक या नाट्यप्रयोगाचे आयोजन राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा घोष आजही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय जनमानसात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सार्वजनिक उत्सवांद्वारे समाजजागृती केली. टिळक स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार आणि महान विचारवंतही होते. इंग्रजांविरोधात परखड लिखाण केल्यामुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. तुरुंगवासात त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, जो आजही प्रेरणादायी मानला जातो. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाने नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.

न्यासातर्फे स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मुन्शी प्रेमचंद आणि राष्ट्रकवी दिनकर यांच्या विचारांचा प्रसार केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून नाटक सादर केले जाणार आहे. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका रत्नागिरीची युवा लोकगायिका राधिका भिडे साकारणार असल्याचे नीरज कुमार यांनी सांगितले.

न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. श्री. सामंत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक मुजीब खान यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये प्रथमच लोकमान्य टिळक यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या माध्यमातून युवकांना स्वराज्याचा इतिहास आणि टिळकांचे कार्य समजून घेण्याची संधी मिळेल.

खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश मगदूम यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “स्वराज्य पर्व” यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. दिल्लीहून आलेल्या प्रतिनिधींमध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार, विश्वभारती शांतिनिकेतनचे हिंदी विभागप्रमुख प्रा. सुभाषचंद्र राय, दिग्दर्शक मुजीब खान तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणारे तेजस पारिख यांनी टिळक जन्मभूमीला भेट दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande