लातूर - 'एसआयआर'मध्ये एकही मतदार मतदानापासून वंचित न राहू देण्याचा काँग्रेसचा निर्धार
लातूर, 29 जून (हिं.स.)। मतदार याद्यांच्या ''स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR)'' मोहिमेच्या नावाखाली विशिष्ट घटकांतील व विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, त्याला काँग्रेस पक्षाकडून तीव्र विरोध करण्यात आला.
एस आय आर समितीची बैठक संपन्न


लातूर, 29 जून (हिं.स.)।

मतदार याद्यांच्या 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR)' मोहिमेच्या नावाखाली विशिष्ट घटकांतील व विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, त्याला काँग्रेस पक्षाकडून तीव्र विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेसच्या 'एसआयआर' जिल्हास्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक काँग्रेस भवन येथे पार पडली.

राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेस निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा 'एसआयआर' समन्वय समितीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी भूषविले.

बैठकीत मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरवर पाहता ही प्रक्रिया नियमित वाटत असली, तरी तिच्यामागे भाजपप्रणीत केंद्र सरकारचा राजकीय हेतू असल्याचा आरोप अभय साळुंके यांनी केला. शहरीकरण, स्थलांतर आणि दुबार नावांचे कारण पुढे करून विशिष्ट जाती, धर्म तसेच गरीब व वंचित घटकांतील मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आगामी निवडणुकांमध्ये सत्ता टिकवण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून 'एसआयआर' प्रक्रिया राबविली जात असल्याची टीका खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केली. संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार असून, एकाही पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार हिरावला जाऊ देणार नसल्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले की, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीने 'बीएलए-१' (BLA-1) प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून, मतदार यादीतील त्रुटी शोधणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, आक्षेप नोंदविणे आणि पात्र मतदारांना मदत करणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यावेळी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्षतेने काम करून एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार असून तो हिरावून घेण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करेल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande