म्हसळा येथे ३० जूनपासून दोन दिवसीय मेगा आधार सेवा महाशिबिर
नवीन आधार नोंदणी मोफत; विविध अद्ययावत सेवाही उपलब्ध रायगड, 29 जून (हिं.स.) : नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या माणगाव उपविभागातर्फे तहसीलदार कार्यालय, म्हसळा येथे दोन दिवसीय मेगा आध
Mega Aadhaar Service Camp in Mhasala on June 30 and July 1


नवीन आधार नोंदणी मोफत; विविध अद्ययावत सेवाही उपलब्ध

रायगड, 29 जून (हिं.स.) : नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या माणगाव उपविभागातर्फे तहसीलदार कार्यालय, म्हसळा येथे दोन दिवसीय मेगा आधार सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. ३० जून ते मंगळवार, दि. १ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या महाशिबिरात नवीन आधार नोंदणीची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आधार कार्डातील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आदी वैयक्तिक (डेमोग्राफिक) माहितीत बदल करण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. फोटो, बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांच्या नोंदीसह बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी १२५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

भारतीय डाक विभागाने नागरिकांना शिबिरास उपस्थित राहताना पडताळणीसाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाल आधारधारकांनी वयाची ५ वर्षे आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करून घेणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, १८ वर्षांपर्यंतच्या नवीन आधार नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर आधार कार्ड तयार होण्यासाठी सुमारे ३० ते ९० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

म्हसळा तालुक्यातील नवीन आधार कार्ड काढू इच्छिणाऱ्या तसेच आधारमधील माहिती अद्ययावत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या दोन दिवसीय मेगा आधार सेवा महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande