
बीड, 29 जून (हिं.स.)।
विलास घुले हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणातील फिर्यादी रमेश घुले यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोट ठेवत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणातील यापूर्वीच बलात्कार, अपहरण, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा खासदार सोनवणे यांनी केला आहे. खोट्या तक्रारींच्या आधारे आमच्यावर आरोप करणारे हे लोक स्वतः किती 'चारित्र्यवान' आहेत, हे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होते, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. विरोधकांना सर्वसामान्यांवर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची सवयच जडली असून वेळ आल्यावर मी सर्वांचे कारनामे आणि काळे धंदे दमादमाने पुराव्यासह उघड करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात आपली नाहक राजकीय बदनामी केली गेल्यामुळे आपण या विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर, बीडच्या एसपींवर आणि एसआयटी प्रमुखांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत खासदार सोनवणे यांनी तपासाच्या पद्धतीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलीस यंत्रणा जर आमचे आणि आमच्या जवळच्या लोकांचे सीडीआर (Call Detail Record) काढत असेल, तर संतोष देशमुख आणि विलास घुले हत्या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी पोलीस ठाण्यात फोन केले आहेत, त्या संपूर्ण टोळीचेही सीडीआर काढण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांची वाट लावण्याचे राजकारण बीडमध्ये सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांच्या पाठीखाली किती अंधार आहे आणि त्यांना जेलमधून कोणाकोणाचे फोन येतात, हे आपल्याला चांगलेच ठाऊक असून वेळ आल्यावर हे सर्व बाहेर काढू, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis