
रायगड, 29 जून (हिं.स.)। महाड तालुका नायक मराठा समाज सेवा संघ समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत वाळण विभागातील वाळण खुर्द येथील ह.भ.प. नामदेव भिवसेन उतेकर यांची बांधकाम उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच सुधाकर कृष्णा चिकणे आणि नयना सचिन उतेकर यांची समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
समाजकार्याची आवड आणि संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर रविवारी, २८ जून रोजी वाळण खुर्द येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, उतेकरवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव उतेकर, सुधाकर चिकणे आणि नयना उतेकर यांना शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
सत्कार समारंभाला उतेकरवाडीतील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, युवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील समाजकार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, नायक मराठा समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)