नसरापूर प्रकरणातील फाशीच्या शिक्षेचे स्वागत;उच्च, सर्वोच्च न्यायालयातही नराधमाला दिलासा नको – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, 29 जून (हिं.स.) - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर भूमिका मांडली. उपसभापतीपदाच्या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


मुंबई, 29 जून (हिं.स.) - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर भूमिका मांडली. उपसभापतीपदाच्या निवडीपासून महिलांसाठीच्या सरकारी निर्णयांपर्यंत, नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरण, पत्रकारांबाबतची भूमिका तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.

उपसभापतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हा निर्णय सभापतींच्या कामकाजातून आणि पक्षाच्या धोरणानुसार होणार असून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. त्यांच्या नेतृत्वामुळेच मला पाचव्यांदा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली. कोविड काळासह अनेक आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची संधी मिळाली असून त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचे मिळालेले सहकार्य लक्षणीय वाटले व पुढील काळातही ते तसेच राज्यासाठी विधायक स्वरूपात चालना देणारे ठरेल .

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात राज्य सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 'लाडकी बहीण' योजना, एकल महिलांच्या प्रश्नांवरील उपाययोजना, तसेच समान नागरी कायद्याच्या दिशेने केंद्र सरकारने उचललेली पावले ही महत्त्वाची आहेत. सभागृहातही या विषयांवर सकारात्मक काम करण्याची संधी मिळाली.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांना अडीच हेक्टरपर्यंत शेतीची जमीन कसण्यासाठी देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. महिला शेती, पशुपालन, रोपवाटिका आणि कृषीपूरक उद्योग यशस्वीपणे करू शकतात, हे लातूर भूकंपानंतरच्या पुनर्वसनातून सिद्ध झाले होते. त्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख देण्याच्या दिशेने सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पालघर येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात या निर्णयाची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कोणत्याही पत्रकाराविषयी अपशब्द वापरणे अयोग्य आहे. शिवसेनेने याची दखल घेतली असून संबंधितांनी जाहीर दिलगिरीही व्यक्त केली आहे. पत्रकारांचा सन्मान आणि संरक्षण व्हावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याबाबत आपण सातत्याने प्रयत्न केल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समन्वयातूनच होईल. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे काम चांगले असल्याचे सांगतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना संधी मिळाल्यास त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि आरोग्य क्षेत्रातील अनुभवाचा देशाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

राज्यातील महिला सक्षमीकरण, कायदा-सुव्यवस्था आणि पक्ष संघटन या तिन्ही आघाड्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

विशेष चौकट : नसरापूर प्रकरणात ६० दिवसांत न्याय; फाशीच्या शिक्षेचे डॉ. गोऱ्हेंकडून स्वागत

नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्णयाचे स्वागत केले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ६० दिवसांत शिक्षा सुनावण्यात आल्याबद्दल त्यांनी न्यायालय, पुणे ग्रामीण पोलीस, तपास यंत्रणा, सरकारी वकील आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अशा अमानुष गुन्ह्यांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो. त्यांनी सरकारने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही प्रभावीपणे बाजू मांडावी, आरोपीला कोणताही दिलासा मिळू नये आणि अपील वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महिला व बालकांविरुद्ध अत्याचार करणाऱ्यांना तातडीने आणि कठोर शिक्षा मिळाल्यास समाजात कायद्याचा धाक अधिक मजबूत होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande